आकाश
आकाश चांदण्यांचे सारे बघून घेतो
ओघात राहिलेले थोडे जगून घेतो
ओझे उभ्या जगाचे पेलून चालतो मी
झाकून वेदनांना थोडे हसून घेतो
लांबून पाहिले ते आभाळ पावसाचे
ते सप्त रंग यारो आता भरून घेतो
मैफील चालली ही साध्याच माणसांची
मैफील रंगण्याला मी ही बसून घेतो
मी हारलो न केव्हा खेळात सज्जनांच्या
मित्रास जिंकण्याला खोटे हरून घेतो
गझलकार : भागवत बनसोडे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा