मागणे राहून गेले
कालच्या भेटीत थोडे भेटणे राहून गेले !
भेटतानाही तुला मी पाहणे राहून गेले !
बोललो मी काय तेव्हा लाजली होतीस का तू;
बोलणे ओठात झाले ऐकणे राहून गेले !
थांबले डोळ्यात माझ्या दाटले जे भाव तेव्हा ;
गूज ते माझ्या मनीचे सांगणे राहून गेले !
तापलेले श्वास तेव्हा तापुनी गेले असे की ;
त्या तुझ्या केसात माझे गुंतणे राहून गेले !
छेडिले मी अन् तुझाही चेहरा झाला गुलाबी ;
दंगलो दोघे तरीही रंगणे राहून गेले !
याचना केल्याविना हे दान तू केलेस कैसे?
दान घेतानाच माझे मागणे राहून गेले !
गझलकार : भागवत बनसोडे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा